Thursday, March 30, 2023

Nifty aftermarket analysis

पारंपरिक परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार- एक गरज

 

कोरोना या वैश्विक आरोग्य विषयक आपत्ती मुळे सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडणार आहेत व त्याचे दूरगामी परिणाम (अर्थातच चांगले आणि वाईट) जगावर होणार आहेत आणि त्या मधील  एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे शैक्षणिक क्षेत्र.या अभूतपूर्व अश्या परिस्थी मध्ये आपण योग्य त्या शिक्षण विषयक संधी शोधून या अनेक वर्षानु वर्षे चालत आलेल्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवायला पाहिजेत आणि ती काळाची नव्हे  तर आत्ताची गरज आहे. हि संधी इष्ट आपत्ती समजून आत्ताच आपण योग्य ती पावले उचलली तर भविष्यातील पिढीला नवा मार्ग सापडेल.

या शैक्षणिक क्षेत्रातील वर्षानुवर्षे न बदलेला आणि बदलाची  आत्यंतिक गरज असलेला भाग म्हणजेच पारंपारीक परीक्षा पद्धती होय.या वर्षी कोरोना मुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या व काही सरकार योग्य तो निर्णय घेईल तेव्हा होणार आहेत. त्यामुळे  अनेक परीक्षार्थी व त्यांचे पालक (सीमेवरील जवानां इतकेच) डोळ्यात तेल घालून या परिस्थी वर नजर ठेवून  आहेत. यावर काय निर्णय होईल तो होईल पण पारंपरिक परीक्षा पद्धतीत काही बदल किंवा काही काळापुढील विचार होणे गरजेचे आहे.

३ इडियट्स या सिनेमा मध्ये अमीर खान चे अनेक सवांद आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीवर भाष्य करतात त्यापैकी एक '' वो समज रहे है कि गले मे pressure आ के मर गया, लेकिन पीछले ४ साल से दिमाग पे जो pressure पड रहा है उस्का क्या? वो तो रिपोर्ट मे है हि नाही...."

पारंपरिक परीक्षा पद्धतीचे अनेक दोष व त्याचे न दिसणारे परिणाम आपण अनेक वर्ष पुढे नेत आहोत आणि त्यात काही बदल घडला नाही तर पुढची अनेक वर्षे आपण ती पुढे नेऊ. परीक्षा पद्धती जी कि अनेक लाखो कोटींचा उद्योग आहे (कोचिंग कलासेस आणि आणि बरेच काही) यास प्रोत्साहन देण्यास कारणीभूत आहे. पण या  परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे योग्य मूल्य मापन करणारी  पद्धती आहे का यावर विचार होणे गरजेचे आहे कारण आपण परीक्षेत विचालेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे हि नंतर आपल्याला  प्रत्यक्ष जीवनात किती कामी येतात आणि आपण परीक्षेत लिहलेले आपणास परीक्षेनंतर  काही दिवसानी किती आठवते (घोकंपट्टी असल्या कारणाने) तसेच आपण लिहलेली उत्तरे शिक्षक ओळ ना ओळ वाचणे तांत्रिक दृष्ट्या किती शक्य आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही नव्हे केलाच जात नाही.

अमेरिकेत The Lawrenceville या शाळेत एक अभिनव प्रयोग करण्यात आला. सुट्टी संपवून अडीज  महिन्यांनी  परत आलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचा पेपर पुन्हा सोडविण्यास सांगण्यात आले. तेव्हा जून महिन्यात दिलेल्या पेपर च्या गुणांची सरासरी जिथे B+ (८७%) होती तिथेच सुट्टी नंतर सप्टेंबर (अमेरिकेत शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिन्यात सुरु होते) महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सरासरी  F (५८%) गुण मिळाले. या प्रयोगावरूनच हे सिद्ध होते कि आपण जे परीक्षे साठी पाठांतर करतो त्याचा नंतर काहीच उपयोग होत नाही आणि आपण त्यासाठी विद्यार्थ्यांना वर्षभर परीक्षेच्या मानसिक दडपणाखाली ठेवतो.

ब्रिटिशांनी भारतीय शिक्षण पद्धती मुळातच सुरु केली ती कारकून आणि assembly line कामगार तयार व्हावेत म्हणून. आणि त्या धरती वरच परीक्षा पद्धतीचा पाय रचला गेला आणि ती अजूनही आपल्या देशात चालूच आहे.त्यामुळेच आज जग एक एक सेकंदाला बदल असताना आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण बदल घडत असताना आपण आजही त्याच जुन्या शिक्षण प्रणाली  आणि परीक्षा पद्धतीत अडकून आहोत.

जागतिक स्तरावर आज पुढे जाताना आपल्याला वास्तविक क्षमतांवर (Real competencies) आणि कौशल्यांवर (life skills)आधारित परीक्षा पद्धती अंगीकारणे उपयोगाचे आहे तरच आपण पुढे नवीन काही तरी पुढील पिढीला देऊ शकू.नाही तर फक्त पाठांतर करून परीक्षेत लिहणे,पुढे नोकरी मिळवण्यासाठी शिकणे आणि त्यासाठी परीक्षा देणे  चुकीचे आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचा आवडीच्या विषयात शिकण्यास मिळाले तर ते आपोआप त्या विषयात प्राविण्य मिळवतात आणि त्यांची प्रगती होते.

जागतिक स्तरावर फिनलंड देशाची शिक्षण पद्धती सर्वात आधुनिक आणि सर्वश्रेष्ठ मानली जाते ती खालील कारणांमुळे.

१) ९ वी पर्यंत विद्यर्थ्यांना एकही परीक्षा द्यावी लागत नाही व तिथे विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय जीवनात क्वचितच गृहपाठ दिला जातो.

२) कौशल्यावर आधारित शिक्षण आणि ९ वी पर्यंत परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थी तणावरहित राहतात.

३) शिक्षणाच्या प्रगतीत मागे पडणाऱ्या मुलांना इतर विद्यार्थ्यांच्या समांतर आणण्यासाठी आणि  एकत्रित शिक्षण सुधारणेसाठी उच्चं शिक्षित व सर्वसन्मानित शिक्षक अतिशय खडतर अश्या निवड प्रक्रियादेद्वारे निवडले जातात ज्यामुळे शिक्षणाचा  दर्जा राखला जातो.

४)फिनलंड च्या शैक्षणिक पद्धतीत व्यावसायिक आणि  व्यावहारिक ज्ञानदानावर भर दिला जातो.

जो  अभ्यासक्रम आपल्याकडे वर्षानु वर्षे शाळांमधून शिकविला जातो तो आता सार्वजनिक झाले आहे जसे कि आपण आता youtube आणि तत्सम online व्यासपीठांवर अक्षरशः काहीही शिकू शकतो तसेच काही online व्यासपीठावर जागतिक दर्जाचे आणि जागतिक विद्यापीठांचे कोर्सेस मोफत किंवा अत्यल्प शुल्कात उपलब्ध आहेत. त्यामुळे इथून पुढे पारंपरिक शिक्षणात आणि परीक्षा पद्धतीत अडकून राहणे शहाण पणाचे असणार नाही.

काही जागतिक आंतरराष्ट्रीय बोर्ड्स (उदा.IB,केम्ब्रिज) सर्वसमावेशक शिक्षण (Collaberative education)व त्यावर आधारित आधुनिक  परीक्षापद्धतींचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यात घोकंपट्टी ऐवजी  परीक्षेत संपूर्ण आकलनावर भर दिला जातो.

एकूण अभ्यासक्रमात प्रकल्प पद्धती (प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग)आणि संशोधनावर आधारित शिक्षण आणि परीक्षा प्रणाली अवलंबली जाते.

पण या बोर्ड्स वर आधारित  (ठराविक प्रमुख शहरे) शाळांची एकूण कमी असलेली संख्या  आणि त्यांची असलेली भलीमोठी फी हा एक वेगळा विषय होऊ शकतो.

पारंपरिक परीक्षा प्रणाली सोडून काही वेगळा विचार अवलंबवायचा असेल तर काही उपाय असे असू शकतात.

(अ) परीक्षेचे गुणांकन-

१) पारंपरिक अभ्यासक्रमाला २०% प्रश्न.

२) पारंपरिक अभ्यासक्रमावर आधारित प्रॅक्टिकल बेस्ड ४०% प्रश्न.

३) प्रकल्प पद्धती (प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग) वर आधारित सादरीकरण व त्यावर आधारित ४०% प्रश्न.

(ब) घोकंपट्टी वर आधारित प्रश्न उत्तरे,प्रमेये,सनावळ्या पाठांतर ह्यांपेक्षा शहर अथवा परिसरातील काही ज्वलंत प्रश्नांचे

(जसे कि पाणी प्रदूषण,रहदारी समस्या)प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना देऊन त्या संबंधीची माहिती गोळा करून, त्यावर गट चर्चेने काही व्यावहारिक अमलात येणारी उत्तरे मुलांनी शोधावी आणि त्या प्रकल्पांवर आधारित प्रश्न मुलांना परीक्षेत विचारले तर त्यात कॉपी करण्याचा आणि एक समान उत्तरे असण्याचा संबंधच उरत नाही.आणि प्रत्येक  विद्यार्थ्याला आपली उत्तर आपल्या भाषेत मांडता येईल आणि आपण काहीतरी अमलात आणत येईल असे काहीतरी करून देऊ शकलो या भावनेने मुलांचा आत्मविश्वासही वाढेल आणि त्यांच्या विचारांना एक नवी दिशाही मिळू शकेल.

(क) इतिहासाच्या परीक्षेत मुलांना फक्त सनावळ्या विचारणे आणि वैकल्पिक प्रश्नांची उत्तरे  पाठ करून लिहावयास सांगणे ह्यापेक्षा परीक्षेमध्ये मुलांना ऐतिहासिक घटनांचे टीकात्मक विश्लेषण (क्रिटिकल अनालिसिस) करायला सांगणे,ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन (हेरिटेज वॉक) त्या स्थळांविषयी काही जुने संदर्भ शोधायला लावावयाचा प्रकल्प विद्यार्थ्यांना  देऊन त्यावर आधारित सुक्ष्म प्रशा मंजुषा आणि ऐतिहासिक लहान प्रबन्ध तयार करायला लावावेत आणि त्यास त्या प्रमाणे गुणांकन दिले तर तो एक परीक्षेचा वेगळा प्रयोग ठरेल.

वरील प्रमाणे प्रत्येक विषयात काही ना काही तरी नवीन करता येईल.

 या वैश्विक आपत्तीत आपण कोरोनावर लस निर्माण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत त्याचप्रमाणे या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परीक्षेच्या विषाणू वर नव निर्माणाची लस तयार झाली तर ते आपल्यासाठी एक उत्तम  पाऊल असेल.......

 

                                                                                                         सिद्धार्थ मोरे.

                                                                           (siddharthmore5@gmail.com)

                                                                            9527062122.